दहिवली बुद्रुक येथील पुलावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी स्वाराचा मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे ते गणेशखिंड असा प्रवास करत असताना दहिवली बुद्रुक येथील पुलावर दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा झालेल्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन पांडुरंग वैद्य (५५) असे त्यांचे नाव आहे. या अपघातप्रकरणी त्यांच्यावर सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन वैद्य हे १४ डिसेंबर २०२३ रोजी दुचाकी घेऊन सावर्डे ते गणेशखिंड असा रात्रीचा प्रवास करत होते. दहिवली बुद्रुक येथील पुलानजीक ते आले असता त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात नितीन वैद्य यांना गंभीर दुखापत झाली. डेरवण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. रविवारी (२८ जानेवारी) पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे