एसटीच्या निवृत्त कर्मचार्‍यांची रत्नागिरीत जोरदार निदर्शने

रत्नागिरी:- एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांची नोंदणीकृत राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी आगाराबाहेर निदर्शने केली.

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्य शासनाकडे विविध मागण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र या मागण्यांकडे एसटी महामंडळासह परिवहन मंत्री सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. 2017 पासून 3175 पेक्षा जास्त सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन प्रशासकीय शुल्क न भरल्याने सुरु झालेली नाही. 2012पासून निवृत्त वेतन ऑनलाईन झाले असून काही विभागांशी अद्याप लिंक झालेले नसल्याने पेन्शन दावे स्वीकारले जात नसल्याचेही या निवृत्त कर्मचार्‍यांचे मत आहे. निवृत्त कर्मचार्‍यांना पती-पत्नीसह वर्षभर गाड्यांमध्ये मोफत प्रवास पासाची सवलत मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळात 20 ते 25 वर्ष सेवा केली अशा निवृत्तांना मोफत पास प्रवास सेवा सवलत मिळावी. एसटी कर्मचार्‍यांच्या मुलांना भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्यात यावे. सेवानिवृत्तांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी यासह तब्बल 26 मागण्यांसाठी राज्यभर सेवानिवृत्तांनी निदर्शने केली.
रत्नागिरी विभागीय कार्यालयासमोर रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष शेखर सावंत, सचिव पी. एस. जाधव, खजिनदार एम.वाय. पंडीत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तिनशेहून अधिक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.