राजापूर:- तालुक्यातील ओणी परिससरातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या रस्त्यासाठी आपली जमीन गेल्याची तक्रार करत एका मुंबइस्थित ग्रामस्थाने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे हत्यार उपसले. ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्यासाठी तो हजरही झाला. मात्र उपोषणाला बसताच क्षणी मुंबईहून आलेल्या त्याच्याच नातेवाइकांनी अक्षरशः बखोटीला धरून गाडीत कोंबले आणि मुंबईची वाट धरली.
सध्या या फसलेल्या उपोषणाचीच चर्चा खुमासदारपणे रंगली आहे. ओणी परिसरातील एका गावात अंतर्गत रस्त्याचा विषय सर्वत्र गाजला होता. अगदी मंत्रालय स्तरापर्यंत तक्रारी झाल्या होत्या. मात्र या सगळ्या वादात नेहमीच ग्रामपंचायतीचा विजय झाला. त्यामुळे चिडलेल्या एका चौकडीने ग्रामपंचायतीला वेठीस धरण्यासाठी अनेक क्लुप्त्या शोधल्या होत्या.
यावर्षी या गावातून जाणाऱ्या जिल्हा मार्ग रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामपंचायतीला त्रास द्यायचा म्हणून या चौकडीने एका मुंबईस्थित ग्रामस्थाला हाताशी धरले आणि प्रत्यक्षात त्याच्या पुतण्याच्या नावावर असणारी जमीन आपलीच आहे असे भासवून ग्रामपंचायतीला त्रास देणे सुरू केले. आपल्याला न्याय मिळत नसल्याचे भासवून या चौकडीने मुंबईस्थित ग्रामस्थाला उपोषणाला बसायला भाग पाडले. त्यासाठीचे सर्व सोपस्कार या चौकडीनेच पूर्ण केले.
उपोषणासाठी या चौकडीने सदर उपोषणकर्त्याला चार दिवस अगोदरच गावाला आणून बाकीच्यांपासून लांब ठेवले. याची कुणकुण गावकऱ्यांना होती. प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाल्यावर उपोषणकर्ता गावात दाखल झाला व उपोषणस्थळी येऊन बसणार त्याच क्षणी मुंबईहून आलेल्या मुलांनी व नातेवाइकांनी त्याला अक्षरशः बखोटीला धरून गाडीत कोंबले व मुंबईचा रस्ता धरला. तेथे उपस्थित पोलिसांनाही काय घडतेय हेच कळत नव्हते. त्यांनी त्या नातेवाइकांना हटकले. मात्र उपोषणकर्त्याच्या वकील मुलाने आम्ही त्यांची मुले आहोत आणि हा आमचा कौटुंबिक मामला असल्याचे सांगत गाडी मुंबईच्या दिशेने रवाना केली.
उपोषणाची दखल ग्रामपंचायतीला व प्रशासनाला घ्यावी लागणार आणि आपल्याला फजिती बघायला मिळणार, या आशेवर असलेल्या त्या चौकडीला मात्र यानंतर मेल्याहून मेल्यासारखे झाले. या फसलेल्या आंदोलनाची चर्चा आता तालुकाभरात खुमासदारपणे रंगली आहे.