रत्नागिरी:- अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त येथील ऐतिहासिक राम मंदिरातून रामलल्लाची विराट शोभायात्रा निघाली. ज्याप्रमाणे रामनवमी, हनुमान जयंतीला शोभायात्रा निघते, त्या प्रकारेच अभुतपूर्व उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला. सजीव देखावे, ढोल-ताशा पथक, बेंजो पथक, पारंपरिक वेषभूषेतील हजारो रामभक्त या यात्रेत सामील झाले.’
श्रीरामाचा जयजयकार करत आणि ढोल- ताशांचा गजर आणि शालेय विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शोभायात्रेची रंगत वाढली. वातावरण भगवे व राममय झाले होते. श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान शोभायात्रा सुरू झाली. पारंपरिक वेशात शालेय मुले, महिलांची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती.
शोभायात्रेची सुरवात श्रीराम मंदिरापासून झाली. काही मुलांनी गीतरामायणातील गीते अत्यंत गोड आवाजात सादर केली. स्थानिक बहुतांश शाळा यात सहभागी झाल्या होत्या. यात दामले विद्यालय, जीजीपीएस, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट स्कूल, सेंट थॉमस स्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल आदी शाळांचा सहभाग होता. प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण, हनुमान यांच्या भूमिका साकारलेल्या बालकलाकरांनी सर्वांचेच मन आकर्षित केले.
रामलल्लाचा रथ ओढण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. प्रभू श्रीरामाच्या भगव्या टोप्या, भगवे झेंडे, पारंपरिक पांढरा झब्बा-लेंगा यासह हजारो भाविक शोभायात्रेत सहभागी झाले. राम मंदिरपासून गोखले नाकामार्गे विठ्ठल मंदिर, आठवडा बाजार येथून यात्रा पुन्हा श्रीराम मंदिरात आली. यानंतर राम मंदिरात महाआरतीचे करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. घरांवरही जय श्रीराम लिहिलेले भगवे हेच फडकत आहेत. संध्याकाळी स्व. प्रमोद महाजन मैदानात आतषबाजी करण्यात आली.