खेलो इंडिया युथ गेम्स ; राष्ट्रीय स्पर्धांमधील सुवर्णमय कामगिरीची दखल
रत्नागिरी:- भारत सरकार आयोजित राष्ट्रीयस्तरावरील खेलो इंडिया युथ गेम्स 2024 स्पर्धा तामिळनाडू येथे होत असून खो-खो स्पर्धेस सहभागी होणार्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज रमेश चवंडे यांची निवड झाली आहे.
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये खो-खो क्रिडाप्रकारात महाराष्ट्राचे मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून राज्यातील तज्ज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची निवड झाली. पंकज यांनी आतापर्यंत असोसिएशनच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तसेच दुसर्या खेलो इंडिया युथ गेम्समध्येही महाराष्ट्र संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी झाला होता. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून पंकज यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तामिळनाडू येथे 19 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघाचे पंकज प्रशिक्षक असतील. रत्नागिरीत आर्यन क्लबमधील अनेक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवले आहेत. तिन महिला खेळाडूंना मानाचा शिव छत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच महाराष्ट्र संघ सुवर्णमय कामगिरी करेल अशी अपेक्षा खो-खो प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईकनिंबाळकर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्यांसह खो-खो खेळाडू व प्रेमींनी अभिनंदन केले आहे. पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरासाठी ते रवाना झाले आहेत.