सुयश गरगटेला सामन्यातील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
भुवनेश्वर:- अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ चा महामुकाबाला जिंकला तो गुजरात जायंट्सने. या अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सवर ५ गुणांनी दणदणीत विजय साजरा करत कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर एकच जल्लोष साजरा केला. विजेत्या गुजरात जायंट्सला रु. एक करोड व चषक, उपविजेत्या चेन्नई क्विक गन्सला रु. पन्नास लाख तर तृतीय क्रमांकाच्या ओडिशा जगरनॉट्सला रु. तीस लाख देऊन गौरवण्यात आले. आजच्या सामन्यामध्ये सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक प्रतिक वाईकर, सर्वोत्कृष्ट संरक्षक आदित्य गणपुले तर रामजी कश्यप सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला.
आज झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सवर ३१-२६ (मध्यंतर १९-७) असा ५ गुणांनी दणदणीत विजय साजरा केला. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व गुजरात जायंट्स ला आक्रमणा साठी आमंत्रित केले. शेवटच्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सला २९-१० अशी १९ गुणांची आघाडी घेत २० गुणांचे आव्हान दिले होते तर गुजरात जायंट्सने अजून ड्रीम रन्स वाढवण्याचे ध्येय समोर ठेवले होते. शेवटच्या टर्न मध्ये दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी उत्सुकता शिगेला नेऊन ठेवली होती. एका क्षणाला चेन्नई क्विक गन्स जिंकणार असे सुध्दा वाटत होते. गुजरातची पहिली तुकडी चेन्नईने अवघ्या सव्वा मिनिटात पापून काढत धुव्वाधार आक्रमणाचे प्रदर्शन केले. दुसरी तुकडी सुध्दा जवळजवळ दोन मिनिटात बाद करत (एकूण ३.१५ मि.) चेन्नईने विजयाच्या आशा पल्लवित केल्या. नंतर तिसऱ्या तुकडीतील अभिजित पाटील सुध्दा लवकर बाद झाला पण त्यानंतर संपूर्ण सामन्याची सूत्रे स्वत:कडे घेत संकेत कदमने नाबाद राहत व दोन ड्रीम रन्सचे गुण मिळवत विजयाला गवसणी घातली व गुजरातच्या पाठीराख्यांनी मैदानात एकच जल्लोष केला व हा सामना ३१-२६ असा जिकला.
या सामन्यात गुजरात जायंट्सच्या दिपक माधव (२.५४ मि. संरक्षण), पबनी साबर (नाबाद १.५४ मि. संरक्षण), शुभम थोरात (१.२६ मि. संरक्षण व २ गुण), संकेत कदम (नाबाद १.४२ मि. संरक्षण व ६ गुण) व सुयश गरगटे, पी. नरसय्या (प्रत्येकी ४-४ गुण) यांनी केलेली कामगिरी गुजरात जायंट्सचे नाव चषकावर कोरण्यासाठी मोलाची ठरली. तसेच गुजरातने या सामन्यात ड्रीम रन्सचे ७ गुण मिळवले व तेच त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. तर पराभूत चेन्नई क्विक गन्सच्या लक्ष्मण गवस (२.५४ मि. संरक्षण व २ गुण), रामजी कश्यप (१.२८, नाबाद १.५० मि. संरक्षण व ४ गुण), विजय शिंदे (१.१७, १.५७ मि. संरक्षण), आदर्श मोहिते (१.४६ मि. संरक्षण), अमित पाटील (१.२२ मि. संरक्षण), सुरज लांडे, आकाश कदम (प्रत्येकी ६-६ गुण) यांनी शर्तीची लढत दिली मात्र त्यांची लढत अपयशी ठरली. तसेच चेन्नईने या सामन्यात ड्रीम रन्सचे फक्त ४ गुण मिळवले व हे कमी मिळालेले ड्रीम रन्स त्यांच्या पराभवात निकाली ठरले व गुजरात जायंट्सने हा सामना ५ गुणांनी अतिशय अटीतटीच्या लढतीत जिंकला. या सामन्यात संकेत कदमला उत्कृष्ट आक्रमक, विजय शिंदेला उत्कृष्ट संरक्षक तर सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने तेलगु योध्दासचा ३२-२४ असा ८ गुणांनी दणदणीत पराभव केला व कांस्य पदकाला गवसनी घातली. या सामन्यात बी. निखीलला उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षक तर दिलीप खांडवीला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सामन्याला खासदार पिनाकी मिश्रा यांनी भेट दिली व खो-खो हा खूप चपळ खेळ असल्याचे सांगत हा वेगवान व बौध्दिक खेळ असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.