शिवसेनेचे उपशहरप्रमुख महेश पत्की यांचे निधन

रत्नागिरी:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख, सन्मित्रनगर बोर्डींग रोड येथील जयभवानी मित्रमंडळाचे सचिव महेश मोहन पत्की (वय 60) यांचे गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

जिल्हा परिषद भवना-नजिकच्या शंखेश्वर अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या महेश पत्की यांना फ्लॅटमध्ये असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नजिकच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी मारूतीमंदिर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तत्पूर्वी महेश पत्की यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होते. तरीदेखील महेश पत्की यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले. मुंबई उपनगरातून रत्नागिरी शहरात आल्यानंतर महेश पत्की यांनी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांशी असलेली आपली नाळ अधिकच घट्ट केली होती. सुंदर हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे अर्ज भरून देण्यासाठी त्यांचा पुढाकार होता. सातत्याने सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या महेश पत्की यांच्या निधनाने शिवसेनेत फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सायंकाळी 5 वाजता महेश पत्की यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नातेवाईक आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश पत्की यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.