कळझोंडी धरणातील पाणीसाठा घटला; जयगड पंचक्रोशीवर पाणी टंचाईचे संकट

रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे जयगड पंचक्रोशीतील गावांसमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. काही वर्षानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आजुबाजूच्या गावातील सुमारे 22 हजार ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागते. टंचाईच्या काळात ग्रामस्थांची तहान कशी भागवणारअसा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

कळझोंडी धरणाचे काम दोन वर्षे रखडले होते. या धरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने गेल्यावर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. 2023 च्या एप्रिल मे महिन्यात धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरातील गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा डिसेंबर महिन्यातच कळझोंडी धरणातील पाणी आटल्या
मुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कळझोंडी धरणावर परिसरातील 14 गावे अवलंबून आहेत. त्यामध्ये सैतवडे, जांभारी, वाटद, कळझोंडी, गडनरळ, आगरनरळ, पन्हळी, सत्कोंडी, कांबळेलावगण, चाफेरी, कासारी आणि वरवडे या गावांचा समावेश आहे. या गावातील सुमारे 22 हजार ग्रामस्थांसमोर आता पाणी टंचाईची मोठी समस्या उभी ठाकली आहे. कळझोंडी धरणातील पाण्यावर ग्रामस्थ अवलंबून असल्यामुळे त्यांना आता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कळझोंडी धरणाचे काम सध्या सुरू आहे. कळझोंडी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्यात येणार आहे. धरणाची उंची वाढल्याने धरणातील पाण्याचा साठा वाढणार आहे. तसेच धरणाचे मजबुतीकरण करण्याचे काम सुरू आहे. धरणाच्या कॉक्रिटीकरणानंतर धरणातील गळती कमी होऊन पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. धरणाच्या कामासाठी साडेसत्तावीस कोटी रुपये मंजूर आहेत. त्यामध्ये धरणाची उंची, पाईपलाईन आणि धरणाकडे जाणारा रस्ता अशी कामे केली जाणार आहेत.