रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिंदे गटात

रत्नागिरी:- रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी बुधवारी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी जेष्ठ उद्योजक आण्णा सामंत, स्वरूपा सामंत आणि किरण उर्फ भय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी रत्नागिरीतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुदेश मयेकर यांची नुकतीच राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती होताच सुदेश मयेकर यांनी जिल्हा दौऱ्यावर भर दिला होता. मात्र त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षांतर्गत अनेक जणांनी केलेल्या हालचालींमुळे सुदेश मयेकर हे नाराज असल्याची चर्चा होती. याच दरम्यान सुदेश मयेकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यचे कारण देत राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येण्याबाबत ना. सामंत यांच्या आई स्वरूपा सामंत यांनी सुदेश मयेकर यांना साद घातली आणि त्याला सुदेश मयेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हा योग बुधवारी १० जानेवारी रोजी सुदेश मयेकर यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

आज, बुधवारी मंत्री सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी रवींद्र तथा अण्णा सामंत, स्वरुपा सामंत, किरण सामंत, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.