जिल्ह्यात मध्यरात्री पासून अवकाळी पावसाची हजेरी; आंबा बागायतदार चिंतेत

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पासून विजांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. आधीच वातावरणातील बदलामुळे फवारणीचा खर्च वाढला असताना आर्थिक बोजा पडलेल्या आंबा बागायतदारांसमोर अवकाळी पावसाचे नवे संकट ओढवले आहे.

अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेले फवारणीचे काय होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

रत्नागिरी शहरात रात्री एक वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस जवळपास एक तास सुरू होता. सकाळच्या सत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण मृग नक्षत्र लागल्यासारखे पावसाळी आहे. त्याआधी सोमवारी लांजातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.