तिसंगी येथे महिलेला ४७ हजारांचा ऑनलाईन गंडा

खेड:- तालुक्यातील तिसंगी-नवानगर येथील एका गृहिणीची ४७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद ४ जानेवारीला येथील पोलिस ठाण्यात झाली दाखल झाली आहे. साक्षी शैलेश भोसले (३४) असे या फसवणूक झालेल्या गृहिणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी साक्षी भोसले या घरी असताना एका अनोळखीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. ‘त्याने आपण एलआयसी ऑफिसमधून बोलतोय, तुमचे पती शैलेश भोसले यांचा एलआयसी पॉलिसीचा हप्ता जमा होत

नसल्याने तो हप्ता तुमच्या खात्यावर जमा करावयाचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल पे अॅप्लिकेशन ओपन करा व मी सांगतो त्याप्रमाणे तुमच्या गुगल पे खात्यावर कारवाई करा म्हणजे तुमच्या पतीचा एलआयसीचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल, असे सांगून या गृहिणीचा विश्वास संपादन केला. भोसले यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे मोबाईल फोनमधील गुगल पे अॅप्लिकेशनमध्ये लोड केल्यानंतर भामट्याने त्यांच्या खात्यातील एकूण ४७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.