जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ५७० नवीन प्रस्ताव

रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून १७ ते ३० डिसेंबर २०२३ कालावधीत झालेल्या गतिमानता पंधरवड्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कालावधीमध्ये ५७० नवीन प्रस्ताव प्राप्त झाले, तर ६९ प्रकरणे बँकांनी मंजूर केली.

उद्योगमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमानता पंधरवडा राबविण्यात आला. अनेक बँकांनी गतिमानता पंधरवड्याला चांगला प्रतिसाद देऊन प्रकरणे मंजूर केली. विदर्भ कोकण बँकेने पंधरवड्यादरम्यान देवळे (ता. देवरूख) व खेड येथे मेळावे घेऊन एका दिवसात २७ प्रकरणे मंजूर करून उल्लेखनीय कामगिरी केली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, महिला, नवउद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हयातील तालुकानिहाय सीएमइजीपी योजनेची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात योजनेची सविस्तर माहिती असलेले ध्वनिप्रक्षेपक व माहिती फलक असलेले वाहन फिरवण्यात आले. या काळात जास्तीत जास्त लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्राने केला. सर्व उद्योग निरीक्षक व अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय पंचायत समिती, सामाजिक संस्था, शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला बचतगटांना प्रत्यक्ष भेटी देऊन लाभार्थीना मार्गदर्शन केले.

पंधरवड्यादरम्यान दर दिवशी दुपारच्या सत्रामध्ये तालुक्यातील बँकांमध्ये जाऊन योजनेअंतर्गत रखडलेल्या प्रकरणांना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. ज्या लाभार्थींची कागदपत्रे अपूर्ण होती, त्यांच्याशी संपर्क साधून पंचायत समितीमध्ये बोलावून पूर्तता करून घेण्यात आली. विविध ठिकाणी मेळावे घेऊन जिल्ह्यातील नवउद्योजकांनी या योजनेअंतर्गत अर्ज भरून आपला उद्योग व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन महाव्यवस्थापकांनी केले आहे.