कारचालकाच्या मृत्यू प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा

असुर्डे अपघात; जखमी पत्नीची फिर्याद

चिपळूण:- असुर्डे खिंड येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूला पक्क्या रस्त्यात धोकादायक स्थितीत कंटेनर उभा केल्याने पाठीमागून येणारी मोटार तिला धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला.

स्नेहल सुनील आंबेकर (५७, रा. यशोधन नगर, कापसाळ, चिपळूण) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात अपघाताची फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे पती मोटारीने आंबेड ते चिपळूण असा प्रवास करत होते. त्यावेळी स्वप्नील अनंत भिसे (रा. चिंचवली, मातंगवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) याने कंटेनर

रस्त्यात साईडपट्टीच्याकडेला उभा केला होता. त्यावेळी सुनील आंबेकर यांची मोटार पाठीमागून कंटेनरला धडकली. यामध्ये सुनील आंबेकर (५५, रा. यशोधन नगर, कापसाळ, चिपळूण) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंटेनरचालक भिसेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सावर्डेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार मनिष कांबळे करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच असुर्डेतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.