तरुणीच्या अपहरणाच्या संशयातून तरुणाला चोप

रत्नागिरी:- तरुणीची समजूत काढण्यासाठी तिला भेटण्यासाठी नातेवाइकांसह आलेला तरुण तिचे अपहरण करत असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने गाडीसह तिथून पलायन केले. अखेर या तरुणाला नाणीज येथे ग्रामस्थांनी पकडले आणि त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी नाणीज (ता. रत्नागिरी) येथे घडला.

घाटमाथ्यावरील एका तरुणाचे एका तरुणीशी दोन वर्षांपूर्वी प्रेम जुळले होते. मात्र, काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून त्या तरुणाविरोधात राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे, तर तरुणीला एका स्वयंसेवी संस्थेत आश्रयाला ठेवण्यात आले आहे. या तरुणीची समजूत काढण्यासाठी हा तरुण त्याची बहीण, भाचा आणि अन्य काही मंडळींसह चारचाकी गाडी घेऊन निवळी येथे आला होता. तिला केस मागे घेण्याचा आग्रह त्यांनी सुरू केला. त्यावरून बाचाबाची झाली आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांना वेगळीच शंका आली. त्यामुळे त्यांनी त्या तरुणाला हटकण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्या तरुणाने चारचाकी गाडीत आपल्यासोबत आलेल्या सर्वांना बसवून तेथून पळ काढला. गाडीत महिला बसलेल्या पाहिल्याने ग्रामस्थांना हा अपहरणाचा प्रयत्न असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कारवाईच्या भीतीने हा तरुण सुसाट वेगाने महामार्गावरून निघाला. हातखंबा येथील पोलिसांना चकवा देऊन तो थेट पालीत पोहोचला. त्यानंतर अंतर्गत मार्गाने तो नाणीज गावात वळला. याठिकाणी ग्रामस्थांनी त्याला अडविले आणि त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे त्या तरुणाचे नाव कळू शकलेले नाही.

रस्त्याच्या कामामुळे फसला
पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने सुसाट निघालेला तरुण नाणीजला अंतर्गत मार्गाने निघाला होता. नाणीज येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने त्याला वेगाने गाडी पळवता आली नाही. रस्त्याच्या मातीच्या ढिगाऱ्यात त्याची गाडी फसली आणि तो ग्रामस्थांच्या तावडीत सापडला.