बाबूशेठ पाटील मित्रमंडळाकडून खंडाळा येथे स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाबुशेठ पाटील मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत नवलाई संघ मिर्या रत्नागिरीने विजेतेपद पटकावले तर सावर्डे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
जिल्हा शुटींग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन खंडाळा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएनशचे उपाध्यक्ष व सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा दोन दिवस आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उपांत्य लढती सावर्डे विरुध्द राजापूर आणि नवलाई मिर्या विरुध्द ब्ल्यू स्टार सैतवडे या संघांमध्ये झाली. यात चार संघांमधून सावर्डे व नवलाई मिर्या हे संघ अंतिम फेरीत पोहचले होते. यात नवलाई मिर्या संघाटने सावर्डेचा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील उपविजेत्या सावर्डे संघाला शिवसेना तालुका संघटक शरद चव्हाण यांच्या हस्ते 11 हजार 111 व चषक देऊन गौरवण्यात आले तर विजेत्या नवलाई मिर्या संघाला बाबूशेठ पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष बाबू पाटील, वाटद जि.प. गटाचे विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते 15 हजार 555 व चषक देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.