अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; २३ दिवसांपासून अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प

रत्नागिरी:- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तिवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, रिचार्जसाठी रक्कम मंजुर करणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे बेमुदत आंदोलन ४ डिसेंबरपासून सुरूच आहे. तेवीस दिवस गावागावातील अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे.

अंगणवाडी कर्मचारी संपाची दखल अद्यापही शासन घेत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तिव्र नाराजी पसरलेली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका सहभागी असल्याने सर्व कामकाज बंद असून, जिल्ह्यात सुमारे अडीच हजार अंगणवाड्या असून त्यांना 23 दिवस कुलुप लागलेले आहे. चिमुकल्यांचा किलबिलाट थांबला आहे. एकीकडे प्रचंड महागाई अन् दुसरीकडे तुटपुंजे मानधन, अशा कात्रीत अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका व मदतनीस सापडल्या आहेत. तुटपुंजे मानधन असल्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा , हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेकदा आंदोलने करूनही शासनाने दखल घेतलेली नसून आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या संपामुळे ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना आहार व आरोग्य, आहार व अनौपचारिक शिक्षण मिळत नाही. किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्याची सेवा मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी आहार, आरोग्यापासून वंचित आहेत. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा, पोषक आहार पुरविण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सुमारे तिस हजाराहून अधिक मुले अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचे कामकाज थांबले आहे.