‘साहेब तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पहायचंय’

कार्यकर्त्यांचे ना.सामंत यांना आशीर्वाद

रत्नागिरी:- ‘साहेब, तुमच्यासारखा नेता होणे नाही, तुमच्यामुळेच आमच्या गावाचा सर्वांगीण विकास झाला’, याहीपुढे तुम्ही रत्नागिरी विधानसभेचे आमदार राहणारच आहात, परंतु साहेब तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे अशी अपेक्षा थेट मतदारांनीच ना.सामंतांकडेच व्यक्त केली. मंगळवारी वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो आबालवृद्धांनी ना.सामंतांनी शुभेच्छा देत मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली. मतदारांच्या या अपेक्षेमुळे ना.सामंतही भावनाविवश झाले.

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांचा 48वा वाढदिवस विधानसभा मतदारसंघात दणक्यात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरासह प्रत्येक जिल्हा परिषद गटात ना.सामंत यांना शुभेच्छा देणारे भलेमोठे बॅनर लावण्यात आले होते. मतदारसंघात अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे ना.सामंत यांचा वाढदिवस मतदारांनी दिवाळीसारखाच साजरा केला.
रत्नागिरी शहर शिवसेनेच्या वतीने श्री देव भैरी चरणी ना.सामंत यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर रिमांड होम येथे मुलांना खाऊचे वाटप, जिल्हा शासकीय रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले. मंगळवारी सकाळपासूनच ना.सामंत पाली येथील आपल्या निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ दुपारपर्यंत कायम होता. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, खातेप्रमुख, शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, काही गावांचे सरपंच, लांजा-राजापूर, संगमेश्वर, देवरूख, चिपळूण, खेड, गुहागर, दापोली येथील ना.सामंत यांचे शेकडो कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाली निवासस्थानी एकत्र आले होते. यावेळी पाली येथे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
मंगळवारी दुपारी ना.सामंत यांचे रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर शहरातील कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती. जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, प्रशांत सुर्वे, शिल्पा सुर्वे, पिंट्या साळवी, सौरभ मलुष्टे, निमेश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.