ना. सामंत यांनी घेतली सुदेश मयेकर यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

रत्नागिरी:- राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजिनामा देणाऱ्या माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या थिबापॅलेस येथील निवासस्थानी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी भेट दिली. ना.सामंत व श्री.मयेकर यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. श्री.मयेकर यांनी राजिनामा दिल्यानंतर ना.सामंत यांनी आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून श्री.मयेकर यांची भेट घेतल्यामुळे श्री.मयेकर शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार का? याचीच चर्चा शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

प्रकृती अस्वास्थतेमुळे आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावर काम करणे शक्य नसल्याचे कारण देत श्री.सुदेश मयेकर यांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केला होता. परंतु तब्येत ठीक नसताना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर श्री.मयेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. रत्नागिरी शहरासह विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी मजबूत करून राष्ट्रवादीमार्फत पुन्हा विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्धार श्री.मयेकर यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी ना.उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजिनामा दिल्यानंतर आठ दिवसातच ना.सामंत यांनी श्री.मयेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तेथेच वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर श्री.मयेकर यांनी ना.सामंत यांचे आपल्या पद्धतीने आदरातिथ्य केले. परंतु ना.सामंत यांच्या भेटीमुळे श्री.मयेकर शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का? याची चर्चा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे भविष्यात श्री.मयेकर शिवसेनेत केव्हा प्रवेश करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.