गुहागर:- तालुक्यातील अंजनवेल बंदरात नांगरून ठेवण्यात आलेल्या नौकेला आग लागून नुकसान झाले. बुधवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिला अचानक आग लागली. या नौकेला लागलेली आग अन्य ग्रामस्थांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नौकेची रस्सी आगीत तुटल्याने नांगर तुटून नौका समुद्राकडे वाहत गेली. दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने तिला समुद्र किनारी आणण्यात आले.
अंजनवेल भोईवाडी येथील मच्छी व्यावसायिक रंजना पडवळ यांच्या मालकीची ही नौका आहे. दर्याचा राजा नंबर IND/ MH- 4- MM²-4883 या नौकेतून गिलनेट पद्धतीने मासेमारी करण्यात येत असे. मंगळवारी ही आग लागण्याची घटना घडली. नौकेला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे आढळून आले. नौकेची केबिन व नौकेतील आतील भागाचे पूर्णतः नुकसान झाले.