घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ॲक्शन प्लॅन

प्रत्येक शाळेची जबाबदारी अधिकार्‍यांसह केंद्रप्रमुखांकडे सोपविणार

रत्नागिरी:- राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणात (स्लॅश) घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. अध्ययन निष्पत्तीसाठी प्रत्येक शाळेची जबाबदारी अधिकार्‍यांसह केंद्रप्रमुखांकडे सोपवली असून त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्यामधील उणिवा भरून काढण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहीत करावयाचे आहे. या भेटीची माहिती ऑनलाईन भरून त्याचा अहवाल सीईओंना सादर करावयाचा आहे. अडीच हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम सुरु गेले तीन आठवडे सुरु आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील स्लॅश सर्व्हेक्षणात जिल्ह्याचे स्थान घसरले आहे. मराठी, गणित या विषयांमध्ये मुलांची प्रगती होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकार्‍यांना शाळा भेटीचा उपक्रम हाती घेतला आहे. दर आठवड्यातून एकदा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. त्यात विद्यार्थ्यांचा पाया कसा आहे, याची माहिती करुन घ्यावयाची आहे. याचा अहवाल थेट सीईओंना करावयाचा आहे. आतापर्यंत अडीच हजार शाळांपैकी 50 टक्के शाळांना भेटी देण्यात आल्या आहेत. शिक्षणामध्ये कमी असलेल्या मुलांसाठी उपचारात्मक उपाय म्हणून शाळा सुटल्यावर एक तास अधिकचे वर्ग शिक्षकांनी घ्यावयाचे आहेत. अनेक शाळांमध्ये हे वर्ग सुरु आहेत. अधिकार्‍यांच्या भेटीमुळे शिक्षकांकडूनही हा उपक्रम गांभिर्याने घेण्यात आला आहे. अधिकार्‍यांनी महिन्याभरात तिनवेळा भेटी देऊन झालेले बदल नोंदवायचे आहेत. रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव जिल्हा परिषद शाळेला सीईओंनी भेट दिली होती. पहिल्या भेटीत त्यांना काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याविषयी शिक्षकांना सुचना केल्या. आठवडाभराने त्याची पुर्तता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिकार्‍यांनी गुणवत्तेबाबत या पध्दतीने गंभीरपणे नोंदी ठेवल्या तर भविष्यात स्लॅश सारख्या सर्व्हेक्षणात जिल्हा परिषद शाळांमधील मुले मागे राहणार नाहीत असा विश्‍वास शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.