रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व तालुक्यातील सावकारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ठोस पावले उचलली आहेत. सावकारीचा प्रचंड मोठा व्यवसाय करताना नागरिकांची पिळवणूक करणार्या निलेश कीर याने ताब्यात घेतलेल्या १ आयशर ट्रकसह ५ दुचाकी मंगळवारी पोलीसांनी जप्त केल्या आहेत.
तर सावकारांच्या छळाला कंटाळून शहर सोडून गेलेल्या ५ जणांपैकी दोघा फिर्यादींसह तीन साक्षिदारांना पुन्हा मुळ घरी आणण्यात पोलीसांना यश आले आहे. तर निलेश कीरसह अन्य सावकरांनी ज्या कर्जदारांच्या जागा हडप केल्या आहेत. त्याच्या व्यावहाराची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
विनापरवाना सावकारीचा पहिला गुन्हा शहर पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर नोंदणीकृत सावकारांच्या छळाला कंटाळलेल्या कर्जदारांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील मोठा सावकार असलेल्या निलेश कीर यांच्या कारनाम्याने पोलीसही हैराण झाले आहे. त्याने सुमारे शंभरहून अधिक गाड्या आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. त्यापैकी १ आयशरसह पाच दुचाकी जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. तर निलेश कीर याच्याकडील कर्जदारांच्या लिस्ट प्रमाणे पोलीस कर्जदारांना शोधत आहेत. मात्र आपल्याकडील कागदपत्रे निलेश कीर याने गायब केली असून ती नेमकी कोणाकडे आहेत ? त्याला कोण मार्गदर्शन करतय यावर पोलीसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
जादा व्याजदराने कर्ज वसूली करणार्या निलेश कीर याने शहर व तालुक्यात मालमत्ता घेतल्या आहेत. त्याचा ताबाही पोलीस घेणार असून त्या सिल केल्या जाणार आहेत. केवळ सावकारी न करता सावकारीच्या नावाखाली निलेश कीर कोण-कोणते उद्योग करत होता. त्याकडेही पोलीसांनी लक्ष दिले आहे. त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे. इतर कारनाम्यांसाठी निलेशला साथ देत त्यामध्ये सहभागी असणार्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. त्यामुळे आता सावकारांसह त्यांच्या साथिदारांचे धाबे दणाणले आहेत.
निलेश कीरसह अन्य नोंदणीकृत, बेकायदा सावकरांनी ज्या जागांचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. त्या व्यवहारांची माहिती सह निबंधकांकडून पोलीसांनी मागविली आहे. त्यानंतर त्या मालमत्ता सिल करुन उपनिबंधकांच्या ताब्यात दिल्या जाणार आहे. नव्या सहकार कायद्यानुसार सावकारांनी लाटलेल्या जागा, मालमत्ता मूळ मालकाला परत मिळण्याची शक्यता आहे.
अनधिकृत सावकार गायब, नोंदणीकृत धास्तावले
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानंतर शहर पोलीसांनी सावकारांविरोधात कडक मोहिम हाती घेतल्यानंतर आता बेकायदा सावकारी करणारे सावकार शहरातून गायब झाले आहेत. तर नोंदणीकृत सावकारांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे तेही चांगलेच धास्तावले आहे. अनेक सावकारांची नोंद असली तरीही त्यांचे व्यवहार कायद्याला अनुसरुन नसल्याने त्यांनी आपली सावकारी थांबविल्याची चर्चा शहरात सुरु आहे.