तीस हजारांचे कर्ज, एक लाखाची वसुली तरीही वसुलीसाठी धमक्या; मिऱ्यावरील निलेश कीरला बेड्या

रत्नागिरी:- सावकारीच्या पाशात अडकलेल्या रत्नागिरीकरांना जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी शहर पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. रविवारी मिऱ्या येथील निलेश कीर याला सावकारी प्रकरणी अटक करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य तिघांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून त्यांनाही अटक केले जाणार आहे. व्याजी दिलेल्या रकमेवर दुप्पट तिप्पट पैसे घेऊनही वारंवार पैशाची मागणी करत बहिणीला अडकवण्याची धमकी निलेशने दिल्याचेही पुढे आले आहे. तर निलेश कीर याने व्याजी रक्कमेच्या बदल्यात कोणा-कोणाच्या गाड्या ताब्यात ठेवल्या आहेत. याचा शोध पोलीस घेत आहेत.

कुवारबाव येथील मंदार सुरेश सुर्वे यांनी लॉकडाऊन पूर्वी निलेश कडून ३० हजार रुपये दहा आठवड्यांच्या मुदतीसाठी घेतले होते. ३० हजाराच्या बदल्यात त्यांनी १ लाख ४ हजार रुपये निलेश किरला दिले. मात्र तरीही निलेश कीर हा मंदार सुर्वे यांच्या मागे पैशासाठी तगदा लावत होता. यापूर्वी त्याने कोरे चेक मंदार सुर्वे यांच्याकडून घेतले होते तर अधिकचे पैसे दे असे सांगत वारंवार शिवीगाळ करून, पैसे दे नाहीतर तुझ्या बहिणीला अडकवतो अशी धमकी वारंवार देत होता.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी सावकारी रोखण्यासाठी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर मंदार सुर्वे यांनीही शहर पोलिस स्थानकात येऊन निलेश कीर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी निलेश कीर याच्याविरुद्ध भादंविक 420,384, 385, 504, 506, 406, 34 व सावकारी अधिनियम 44, 45 नुसार गुन्हा दाखल करून निलेश कीर याला अटक केली आहे. त्याने मंदार सुर्वे वगळता अन्य कोणाला व्याजी पैसे दिले आहेत. त्या बदल्यात त्याने गाड्या, दुचाकी, रिक्षा आपल्या ताब्यात घेऊन ठेवले आहेत का? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.