जिल्ह्यातील 55 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 55 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी गुहागर, संगमेश्वर व लांजा तालुक्यातील आहेत.

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ही घरकुल आहेत. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजना रत्नागिरी जिल्हास्तरीय समितीने 13 मार्च 2023 मध्ये झालेल्या बैठकीत मंजूर करून ते प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने या योजनेंतर्गत 2023-24 करिता जिल्ह्यातील प्रति लाभार्थी 1.20 लक्ष प्रमाणे 66 लक्ष व 4 टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल 4800 प्रमाणे) 2 लक्ष 64 हजार असा एकूण 68 लक्ष 64 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या लाभार्थ्यांमध्ये दापोली तालुक्यातील ओणनवसे येथील 5, देर्दे येथील 9, गुहागर तालुक्यातील साखरी खुर्द येथील 7, मुंढर येथील 2, अडूर नागझरी -1, विसापूर -1, साखरी आगर-2, संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-2, मुचरी -1, कनकाडी -2, चाफवली-1, तुळसणी-1, हातीव-मुरादपूर-2, मुचरी-1, वांझोळे -2, असुर्डे-1, देवरूख वाशी -1, लांजा तालुक्यातील गवाणे – 2, शिपोशी-4, केळवली-2, चांदिवणे-1, सालपे-2, चिपळूण तालुक्यातील उमरोली-1, केतकी भोईवाडी-1 येथील लाभार्थ्यांचा समावेश आहे.