आंबा, काजू बागायतदारांचे उपोषण स्थगित

रत्नागिरी:- रत्नागिरीत आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू ठेवलेल्या आमरण अधिक साखळी उपोषणाची स्थानिक प्रशासन वा लोकप्रतिनिधी स्तरावरून आठवड्यात तरी दखल घेतली जाईल असे वाटत होते. पण उपोषणकर्त्यांच्या अपेक्षांचा कडेलोट झाल्याने या सर्व बागायतदारांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांनी जबाबदारी हाती घेतली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासित केल्यामुळे ह उपोषण शनिवारी तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

गेल्या सोमवारपासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर आंबा, काजू बागायतदारांचे हे आंदोलन सुरू होते. करबुडे येथील आंबा बागायतदार शेतकरी रामचंद्र मोहिते यांनी तर पुकारले होते. इतर बागायतदारांनी त्याला पाठीबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. उपोषणाच्या माध्यमातून आमची रास्त मागणी ऐकून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील अशी अपेक्षा होती. पण गेल्या आठवडाभरात या आंदोलनकर्त्यां येथील बागायतदार शेतकर्‍यांची बाजू कुणीही ऐकून घेण्यास पुढे सरसावलेले नव्हते.
येत्या हिवाळी अधिवेशनात तरी शासनाकडून न्याय मिळेल, येथील स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा या आंदोलनकर्त्यां बागायतदार, शेतकर्‍यांनी व्यक्त केलेली होती. पण गेल्या आठवडाभरानंतरही आपल्या मागणीवर काहीही ठोस निर्णय वा लोकप्रतिनिधींनीही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यां बागायतदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी या आंदोलनकर्त्यांची बाजू शासनदरबारी निकाली निघावी, यासाठी माजी आमदार बाळ माने, माजी जि.प.सदस्य उदय बने यांनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावली. त्यावेळी बागायतदार संघटनेचे पकाश उर्फ बावा साळवी, टि.एस.घवाळी, परशुराम कदम, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, आदींची उपस्थिती होती.

बागायतदारांच्या या प्रश्नी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना (उबाठा गट) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी माजी जि.प.सदस्य उदय बने यांनी संपर्प साधला. गीते व दानवे यांनी बागायतदारांच्या या आंदोलनाची दखल घेत शासनाकडून योग्य निर्णय घेण्यासाठी चर्चा केली जाईल असे आश्वासित केले. तर माजी आमदार बाळ माने यांनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत बावनकुळे, कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न धसास लावण्याचा शब्द बागायतदारांना दिला आहे. त्यामुळे बागायतदारांनी हे सुरू ठेवलेले उपोषण तूर्तास मागे घेतले आहे.