प्रत्येक जिल्ह्यात लवकरच स्पेशालिटी रुग्णालय: मुख्यमंत्री

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण

रत्नागिरी:- सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फीत कापून आणि कोनशिला अनावरण करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन नमो 11 सुत्री कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डाॕ राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधिष्ठाता डाॕ जयप्रकाश रामानंद, शिरगाव सरपंच फरिदा काझी, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिलेला शब्द पूर्ण करणं, वचनपूर्ती करणं आणि वेळेत पूर्ण करणं याचं ज्वलंत उदाहरण आजचे लोकार्पण आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा शुभारंभ होत आहे. 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील 400 ठिकाणी झाली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं, सर्वसामान्यांच्या मनातलं गतिमान सरकार आहे, हे याचं उदाहरण पाहतोय. आम्ही जनतेशी बांधील आहोत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे.
आरोग्य विभागावर फोकस केला आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम 5 लाखांवर वाढविली आहे. योजना वाटणारं, योजना देणारं सरकार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 1 कोटी 80 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला 118 कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मधून 160 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, मायबाप बळीराजाने चिंता करु नये. बळीराजाला वाऱ्यावर सोडणारं नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द आहे. नमो 11 सुत्री कार्यक्रम या सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.