रत्नागिरी मेडीकल कॉलेजचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

नमो 11 सुत्री कार्यक्रमासाठी 10 हजार लाभार्थ्यांची उपस्थिती

रत्नागिरी:- रत्नागिरीवासियांचे स्वप्न असणारे मेडीकल कॉलेज यावर्षीपासून खर्‍या अर्थाने सुरु झाले असले तरी त्याचे अधिकृत उद्घाटन गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. याचवेळी नमो 11 सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालय व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कमतरतेचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यावर तोडगा काढता यावा यासाठी रत्नागिरीत मेडीकल कॉलेज व्हावे म्हणून जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत हे मागील काही वर्ष प्रयत्नशील होते. काही वर्षापूर्वी रत्नागिरीसाठी मंजूर असलेले मेडीकल कॉलेज कोल्हापूरला नेण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये मेडीकल कॉलेज मागील सरकारने मंजूर केले. परंतु रत्नागिरीत मेडीकल कॉलेज होत नव्हते. मात्र नव्या सरकारने रत्नागिरीवासियांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
या मेडीकल कॉलेजमुळे दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे येत्या चार-पाच वर्षानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त नमो 11 हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने राबवला आहे. या उपक्रमाची सुरुवात राज्यात झाली असली तरी ज्या सर्वसामान्य लोकांसाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे, त्या लोकांच्या उपस्थितीमध्ये राज्यात पहिल्याच कार्यक्रम रत्नागिरीत होत असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी 10 हजारहून अधिक लाभार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी साडेनऊ कोटी रुपये देण्यात आले आहेत. महिला बचत गटांसाठी काम करणार्‍या सीआरपींसाठी मोबाईल देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी दिव्यांगशक्ती अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. कामगार कल्याण अभियानांतर्गत दोन हजार कामगारांना किटचे वाटप केले जाणार आहे. नमो शेततळे कार्यक्रमांतर्गत शेततळे कार्यक्रम राबवला जात असून, दोन शेतकर्‍यांना यासाठी अनुदान दिले जाणार आहे. आत्मनिर्भर सौरऊर्जा योजनेतंर्गत गोळप व गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सोलार प्लाँन्ट उभारणी, ग्रामसचिवालय अभियान, नमो स्मार्ट शाळा अभियान, जिल्हा क्रीडा संकूल, राजापूर व चिपळूणमधील क्रीडा संकुल उभारणीच्या कामाचा शुभारंभ, नमो मागासवर्गीय सन्मान योजना कामांचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.