सलगच्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी

रत्नागिरी:- गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग दिवस आल्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. सुमारे १५ ते १७ हजार पर्यंटकांनी गणेशाचे दर्शन घेऊन किनाऱ्यावर आनंद लुटला. मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या घेऊन पर्यटक आल्याने गणपतीपुळे मार्गावर वारंवार वाहतूककोंडी झाली; परंतु गणपतीपुळेत पर्यटक मुक्काम न करता पुढे निघून जात असल्याने स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत.

गणपतीपुळेत गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. येथे खानावळीमध्ये जेवणासाठी रांग लागलेली दिसून येत आहेत तसेच परिसरातील सर्वच लॉजमध्ये गर्दी आहे. आलेला पर्यटक हा येथे न थांबता तारकर्ली, गुहागर आदी ठिकाणी जाण्यासाठी तयार असतो. आज दिवसभर अनेकांनी गुहागर, श्रीवर्धन, तारकर्ली आदी ठिकाणांची चौकशी केल्याने स्थानिक व्यावसायिक नाराज होते. गणपतीपुळे येथे पर्यटक टिकवायचे असतील सामुदायिक प्रयत्न व्हायला हवेत. येथील सर्व उपलब्ध व आवश्यक सुविधांचा विचार व्हायला हवा, अशी चर्चा येथील व्यावसायिक करत आहेत. पर्यटक मुक्कामाला थांबेल, असे काही नवीन प्रकल्प गणपतीपुळ्यात होण्याची गरज आहे.
गणपतीपुळे परिसरात आपटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असून, कोल्हटकर तिठा येथेही वाहतूककोंडी होत आहे. जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळवी, जयेश कीर, नीलेश गुरव, कुणाल चव्हाण, बंदोबस्तासाठी आलेले सर्व पोलिस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व वाहतूककोंडी कमी कराण्यासाठी प्रयत्न करत होते.