जिल्ह्यातील 9 हजार शेतकऱ्यांनी उतरवला फळपीक विमा

रत्नागिरी:- प्रतिकूल हवामानापासून फळपिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकविमा योजनेमध्ये काजू व आंब्याचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. या योजनेत आतापर्यंत 9 हजार 19 शेतकऱ्यांनी 5 हजार 280.8 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा पर्याय म्हणून कृषी विभागामार्फत दरवर्षी हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबवण्यात येते. यंदाच्या आंबिया बहारासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा. जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू राहील. जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत 9 हजार 19 शेतकऱ्यांनी 5 हजार 280.8 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला आहे. या योजनेत सहभागी होऊन आपल्या फळपिकांचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करावे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत काजू व आंबा पिकांकरिता ३० नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा तसेच अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा तसेच पिकविम्यासाठी फळपिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर बंधनकारक असल्याने ई-पीक पाहणी अॅपद्वारे फळपिकांच्या नोंदी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.


४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा नोंदणी

एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॕगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये व विमा हप्ता 13 हजार 300 रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये, विमा हप्ता 5 हजार रुपये आहे.