कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

…अन्यथा ८ डिसेंबरला ‘चलो नागपूर”

रत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम
करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदावर समायोजित करावे. या बाबत शासनाने लेखी आश्वासन द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील आरोग्यसेवकांसह ८०० कर्मचारी गेल्या २४ दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे ऐन दिवाळीत ग्रामीण भागाच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सोमवारी जिल्हा परिषदेजवळ रॅली काढून आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या आठ डिसेंबरला नागपूर येथे राज्यव्यापी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष सेजल रसाळ यांनी दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००५ पासून कंत्राटी काम करणारे ३५ हजार डॉक्टर, परिचारिका तं अन्य गेली काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू होते. या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. कायम सेवेत सामावून घेणे तसेच वेतनातील तफावत दूर करण्यासह त्यांच्या काही मागण्या होत्या. तेव्हा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळा सोबत मंत्रालयात चर्चा झाली. वयाची अट शिथिल करून दहा वर्षे सेवा झालेल्या ३० टक्के कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, तसेच वेतनातील असमानता दूर केली जाईल, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले होते.तसेच याबाबतचे धोरण मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री सावंत हे आझाद मैदान येथे जाऊन आंदोलन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे निर्णय जाहीर केले. तीन वर्षांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी लेखी आश्वासनाशिवाय मागे न हटण्याचा निर्णय घेत आपले आंदोलन पुन्हा सुरू केले.

जिल्ह्यातील आरोग्यसेविकांनी जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहील, अशी माहिती कंत्राटी आरोग्य सेविका कार्याध्यक्षा सेजल रसाळ यांनी दिली. सोमवारी जि.प. जवळ रॅली काढून आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेपासून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत आणि तेथून पुन्हा जिल्हा परिषद अशी ही रॅली काढण्यात आली.यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या सेजल रसाळ यांनी यावेळी सांगितले, की आज (सोमवारी) सायंकाळी उशिरा राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे .यामध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी राज्यव्यापी विशाल मोर्चा नागपूर येथील आरोग्य भवनावर काढण्यात येणार आहे.