जिल्ह्याची लंपीची साथ आटोक्यात

१,९२२ जनावरे बरी झाली तर ३९९ जनावरांवर औषधोपचार सुरू

रत्नागिरी:- लंपी स्कीनचा जोर कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये ३९९ जनावरांना लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मागील दोन महिन्यांपासून लागण झालेल्या जनावरांची संख्या वाढत होती. मात्र, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने साथ आटोक्यात आणली आहे.

गतवर्षी लंपीच्या साथीने अनेक जनावरे दगावली होती. त्यानंतर लंपीची साथ आटोक्यात आणण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. तसेच जनावरांचे बाजारही बंद करण्यात आले होते. जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पाळीव जनावरांच्या लसीकरणावर भर देण्यात आली होती, तसेच पुन्हा सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात लम्पीने डोके वर काढले होते.

मागील दोन महिन्यांच्या कालावधीत २,४८४ जनावरांना लंपीची लागण झाली आहे. त्यामध्ये दापोली तालुक्यात ४७, चिपळुणात १२३, संगमेश्वरात १०४, गुहागरात ६, रत्नागिरीत ११२१, लांजात ८३६ आणि राजापुरातील २३६ जनावरांचा समावेश आहे. तर मंडणगड आणि खेड या दोन तालुक्यांतील या वेळी एकाही जनावराला लागण झालेली नाही. दुसऱ्यांदा आलेल्या लम्पीच्या साथीत १६३ जनावरे दगावली आहेत. तर १,९२२ जनावरे बरी झाली असून, ३९९ जनावरांवर औषधोपचार सुरू आहेत. तर ३० जनावरांची स्थिती गंभीर आहे.