पोलीस अधीक्षक कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग

कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण

रत्नागिरी:- शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किट होवून पोलीस अधीक्षक कार्यालयातील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या दालनाबाहेर आग लागल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात खळबळ उडाली. कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखवत वीज पुरवठा खंडीत करुन अग्निशमन सिलेंडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर तात्काळ पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत आग अटोक्यात आली होती.

शुक्रवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड ह्या जेवण करण्यासाठी आपल्या निवासस्थानी गेल्या होत्या. कर्मचारीही जेवण करण्यासाठी बसलेले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दालनातून धूर बाहेर येवू लागला. काही वेळात धूराचे प्रमाण वाढले. दालनातील धूर मोठ्याप्रमाणात अधीक्षक कार्यालया आवारातील मोकळ्या जागेत आल्यामुळे कुठे तरी आग लागल्याचे कर्मचार्‍यांच्या लक्षात आले.

त्यानंतर सर्वच कर्मचार्‍यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या दालनाच्या दिशेन धाव घेतली. यावेळी दालनाला लागून असलेल्या खोलीत शॉर्ट सर्किट होवून इलेक्ट्रीक वायर पेटलेल्या असल्याचे कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. त्यातील एका कर्मचार्‍यांने सतर्कता दाखवत वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर वायरने पेट घेतलेल्या ठिकाणी अग्निशमन सिलेंडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात कर्मचार्‍यांना यश आले. याच कालावधीत काही कर्मचार्‍यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. तेही पथक तात्काल पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते.

या घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आली. त्यांनीहि घटनास्थळी येवून पहाणी केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकामच्या विद्युत विभागाचे अभियंता, महावितरणचे कार्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र सतर्कता दाखवून आगीवर नियंत्रण मिळविणार्‍या कर्मचार्‍यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.