हायस्पीड ट्रॉलरवर अंकुश ठेवण्यासाठी मत्स्य खात्याच्या ताफ्यात लवकरच हायस्पीड नौका

रत्नागिरी:- हायस्पीड ट्रॉलरनी (फास्टर बोटी) कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 400 अश्‍वशक्तीची नवीन हायस्पीड नौका सहाय्यक मत्स्य विभागाला देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकर ही नौका जिल्ह्याला मिळेल, असे सहाय्यक मत्स्य आयुक्त अभयसिंह शिंदे-इनामदार यांनी दिली.

मलपी नौकांचा महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये धुमाकूळ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेलाच परराज्यातील नौकांनी घेराओ घातला होता. तरीही संबंधित पथकातील लोकांनी ती नौका पकडून मिरकरवाड बंदरात आणली. सध्या गस्तीसाठी उपलब्ध असलेली नौका कमी वेगाने जाणारी आहे. ती हायस्पीड नौकांच्या समोरे टिकाव धरू शकत नाही. परराज्यातील नौकांकडून होणारे अतिक्रमण मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून समुद्रक्रिनारी असलेल्या जिल्ह्यांना गस्तीसाठी 400 अश्‍वशक्तीची नौका मंजूर केली आहे. ती नौका भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून डिसेंबरच्या अखेरपर्यंत मत्स्य विभागाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ही नौका वेगवान असल्यामुळे मलपी नौकांचा पाठलाग करणे शक्य होईल. तसेच गस्त घालताना नौकेवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सुचनाही अधिकार्‍यांनी केल्या आहेत. त्यानुसार भविष्यात कार्यवाही केली जाणार आहे. सध्या 70 ते 80 मलपी नौका एकाचवेळी रात्रीच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत सर्वसाधारण 12 नॉटीकल मैलच्या आतमध्ये मासेमारीला येत आहेत. तार्ली आणि हैद यासारखी मासळी मोठ्याप्रमाणात मिळत असल्याने त्यावर डल्ला मारण्यातसाठी येत आहेत. गस्ती नौका येत असल्याचे लक्षात आल्यानंतर मलपी नौका वेगाने जाळ्यासह पळून जाण्यात यशस्वी होता. त्यांना रोखणे सध्याच्या गस्तीनौकेला शक्य होत नाही.

दरम्यान, शनिवारी पकडलेल्या त्या मलपी नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी उदया सहाय्यक मत्स्य आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. त्यावेळी पाच पट दंडाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


शस्त्र वापरण्याचा परवाना प्रस्ताव प्रलंबित
खोल समुद्रात कारवाई करण्यासाठी जाणार्‍या पथकाला शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा यासंदर्भात 2018-19 ला शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याच्यावर योग्य ती कार्यवाही झाली तर गस्त घालताना अनुचित प्रकाराला सामोरे जाणे अधिकार्‍यांनाही शक्य होईल. मात्र शस्त्र बाळगणे किंवा त्याचा वापर करणे याबाबतच्या मुद्द्यावरून परवानगी दिली गेली नसल्याचे पुढे आले आहे.