कर्नाटकातील ३० हायस्पीड नौकांची घुसखोरी; एक नौका मत्स्य विभागाच्या ताब्यात

रत्नागिरी:- कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरनी (फास्टर बोटी) महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये घुसखोरी करून धुमाकुळ घातला आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हुसकावण्याच्या प्रयत्न केला. परंतु घुसखोरी करणाऱ्या ३० नौकांनी गस्ती नौकेलाच घेराओ घालून घाबरविण्याचा प्रयत्न केला. मत्स्य विभागाच्या धाडसी पथकाने विरोध झुगारून एका नौकेवर ताबा मिळवत ती पकडली. या नौकेवर सुमारे २ लाख २६ हजाराची मासळी मिळली. ही नौका मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता.१०) रात्री हे पथक समुद्रात सुमारे ८ ते १० वावामध्ये गस्त घालत होते. तेव्हा महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये कर्नाटकातील सुमारे ३० ते ३५ हायस्पीड नौकांनी घुसखोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कमी आस असलेल्या जाळ्यांचा वापर करून कर्नाटकातील या नौकालहान मोठी मासळी मारून नेतात. मत्स्य विभागाचे पथक तिथे पोहचल्यानंतर या घुसखोऱ्यांनी या पथकालाच घेरोओ घातला. त्यांच्या अंगावर येत भिती घालण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकारी जोशी आणि सहकाऱ्यांनी न डगमगता एका बोटीचा ताबा मिळविला. या बोटीवर ताबा मिळविल्यानंतर उर्वरित बोटींनी तेथुन पळ काढला. पथकाच्या जिवाला मोठा धोका होता. तरी त्यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे.
श्री. नित्यानंद असे गस्ती नौकेने पकडलेल्या कर्नाटकातील घुसखोरी करणाऱ्या ट्रॉलरचे नाव आहे. यावर सात खलाशी आणि एक तांडेल आहे. गस्ती पथकाने ट्रॉलरवर ताबा मिळवून ती मिरकरवाडा बंदरात आणून स्थानबद्ध केली आहे. नौकेवर मिळालेल्या मासळीचा लिलाव सुमारे २ लाख ६१ हजार रुपये झाला आहे. परराज्यातून येऊन घुसखोरी केल्याबद्धल त्यांना २ लाख रुपये दंड आहे. जाळ्यांचा आकार लहान असल्याने त्याचा वेगळा दंड आहे आणि मिळालेल्या मासळीच्या ५ पट दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे या नौका मालकाला १६ लाख दंड बसण्याची शक्यता आहे. यावर सोमवारी सहायक मत्स्य आयुक्तांकडे याची सुनावणी होणार आहे. सहायक मत्स्य आयुक्त अभय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय जोशी, तुषार करगुटकर, कुणाल वैद्य, गणेश धांगडा आणि अजय कोकरे, अभिजीत सालकर यांनी ही कारवाई केली.