जागतिक कीर्तीच्या 19 रांगोळीकारांचे प्रथमच रत्नागिरीत रांगोळी प्रदर्शन

उदय सामंत फाऊंडेशनकडून आयोजन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील “उदय सामंत फाऊंडेशन” आणि ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून रत्नागिरीकरांना जागतिक पातळीवरील रांगोळीकरांच्या थक्क करून सोडणाऱ्या रांगोळ्या अनुभवायची संधी मिळणार आहे. “इंद्रधनु रंगावली प्रदर्शन 2023” शीर्षकाखाली जागतिक कीर्तीचे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर 19 रांगोळीकार रत्नागिरीत रांगोळ्या साकारत आहेत. जागतिक कीर्तीच्या 19 रांगोळीकरांच्या रांगोळ्या एकाचवेळी पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना प्रथमच उपलब्ध झाली आहे. एकाहून एक अफलातून रांगोळ्या दिवसरात्र साकारण्यात रांगोळीकार सध्या मग्न आहेत. रत्नागिरी शहरातील दामले हायस्कूलमध्ये १४ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत ह्या रांगोळ्या रत्नागिरीकरांना विनामूल्य पाहता येणार आहेत.

आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उदय सामंत फाडंडेशनचे काम सुरूच आहे. पण यांसोबतच 14 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या “इंद्रधनु”च्या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून रत्नागिरीच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचा हातभार उदय सामंत फाउंडेशनतर्फे लावण्यात येणार आहे.

जागतिक किर्तीचे रांगोळीकार राहूल कळंबटे, निखील कांबळे, समिधा रसाळ, कुणाल किर, अजय पारकर, कौस्तुभ सुतार, गुरूप्रसाद देवघरकर, प्रविण वेळणस्कर, विलास रहाटे, रोहित कोकरे, अक्षय वहाळकर, तेजस गोसावी, केदार टेमकर, सचिन अवसरे, अभिजीत सूर्यवंशी, विशाल चौघुले, विकास नांदिवडेकर, योगेश पाटील, पंकज पाटील हे रांगोळीकार या प्रदर्शनात आपली रांगोळी कला सादर करणार आहेत. रत्नागिरीच्या कळंबटे यांच्यासह मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, इस्लामपूर याठिकाणचे हे जागतिक कीर्तीचे रांगोळीकार रत्नागिरीत आले आहेत.

गेला आठवडाभर हे सर्व कलाकार रांगोळी काढण्यात मग्न आहेत. त्यानंतर हे प्रदर्शन 14 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबर या कालावधीत दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व रत्नागिरीकरांना बघण्यासाठी दामले विद्यालय, रत्नागिरी येथे सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे.

या प्रदर्शनामध्ये आपल्याला 3 D रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी, सामाजिक विषय, रत्नागिरीतील प्रसिद्ध स्थळे अशा विविध प्रकारच्या 35 विलोभनीय कलाकृती पहायला मिळणार आहेत.

इंद्रधनु रांगोळी प्रदर्शाचे उद्घाटन 14 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 4 वाजता दामले हायस्कूल येथे रत्नागिरीतील जुने सुप्रसिद्ध रांगोळीकार प्रभा पिलणकर, कृष्णा जाधव यांच्या शुभहस्ते तसेच प्रशांत राजिवले, राजू भाताडे, प्रविण कांबळे, संतोष साळवी, प्रशांत पवार, राजू वाघाटे या रत्नागिरीतील जुन्या नामांकित रांगोळीकारांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी रत्नागिरीकरांनी, शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट देण्याचे आवाहन उदय सामंत फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.