मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने

अतिक्रमणे साफ ; कळकदऱ्यापर्यंत घाटाची कटाई

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. परटवणेपासून पुढे साळवीस्टॉपर्यंत दोन्ही बाजूची अतिक्रमणे जवळजवळ हटवण्यात येत आहेत. नर्मदा सिमेंट कंपनीसमोर तर मूळ रस्ता काढून चौपदरीकरणासाठी दोन्ही बाजूने समांतर सपाटीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे.

मिऱ्यापासून चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. साखरपा, नाणीज, पाली, हातखंबा येथे वेगाने काम सुरू आहे. आंबाघाटातीलही कळकदऱ्यापर्यंत घाट एका बाजूने कापण्यात आला आहे. साखरप्यापासून पुढे नाणीजपर्यंत आणि तेथून पुढे पालीपर्यंत जोरदार काम सुरू आहे. अनेक ठिकाणी एक लाईन सुरू झाली आहे. त्यामुळे साखरप्यापर्यंतचा लागणारा वेळ कमी झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गामध्ये पाली ते हातखंबा हा भाग येणार आहे. तेथून पुढे हातखंबा ते मिऱ्या हा भाग मिऱ्या-नागपूर चौपदरीकरणात आहे.
परटवणेपासून पुढे या रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. फिनोलेक्स गेस्ट हाऊससमोरील वळण काढून हा रस्ता काढण्यात आला आहे. नर्मदा सिमेंटच्या समोरील मुख्य रस्ता जेसीबीने काढून दोन्ही बाजूने चौपदरीकरणासाठीचे सपाटीकरण सुरू आहे.