मुहूर्ताची पहिली पेटी रत्नागिरीतून वाशी मार्केटकडे रवाना

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश अनंत शितप यांच्या रत्नागिरीतील बागेतून हापूस आंब्याची मुहूर्ताची पेटी पहिली पेटी मंगळवारी (ता. 31) सायंकाळी वाशी मार्केटला रवाना झाली. ऑक्टोबर महिन्यात हापूसची पेटी जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.

गतवर्षी आंबा हंगाम यथातथाच होता. यंदा जुन महिन्यात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. या कालावधीत उन्हाचा कडाका होताच. रुपेश शितप यांच्या रत्नागिरीत शहराजवळील भाटये येथील आंबा बागेतील एका उंच हापूसच्या झाडाला. जुलै महिन्यात मोहोर आल्याचे लक्षात आले. या झाडाला लवकर पालवी फुटून ती जून झालेली होती. याच कालावधीत पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा कडाका सुरु होता. त्यामुळे झाडाला बसलेल्या ताणामुळे मोहोर आला. पावसाळ्यात मोहोर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर तो सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदार रुपेश शितप यांनी पावले उचलली. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी केली. बागेतील ते झाड सुमारे 80 ते 90 फुट उंच असल्यामुळे मोहोराच्या सुरक्षिततेसाठी कसरत करावी लागली. मोहोरानंतर फळ तयार होईपर्यंत शितप यांनी काळजी घेतली. सुदैवाने त्यांच्या मेहनतीला यशही आले. मोठ्या आकाराचे फळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी फळांची काढणी केली. चार डझनची पेटी म्हणजेच 48 फळं शितप यांनी वाशी बाजारात विक्रीसाठी व्यापार्‍याकडे पाठवली आहेत. ही पेटी बुधवारी वाशीमध्ये पोहचेल. फळाचा आकार मोठा असल्यामुळे आणि या कालावधीत हापूस बाजारात येत नसल्याने विस हजाराहून अधिक दर मिळेल अशी अपेक्षा रुपेश यांनी व्यक्त केली आहे.
पावसात आलेल्या मोहोराची योग्य काळजी घेतल्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात हापूसची चव चाखायला मिळणार आहे. यापुर्वी शितप यांच्या बागेतून दिवाळीच्यानंतर हापूसची पेटी पाठविण्यात आली होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात प्रथमच हापूसची पेटी बाजारात विक्रीसाठी पाठवल्याचे रुपेश यांनी सांगितले.

दरम्यान, हापूसचा हंगाम खर्‍या अर्थाने मार्च ते जुन पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. काहीवेळा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आंबा बाजारात दाखल होतो. परंतु पावसाळा संपल्यानंतर या पध्दतीने आंबा पेटी बाजारात गेल्याची नोंद प्रथमच झाली आहे. अनियमित पावसामुळे झाडांना मोहोर येण्याचे प्रकार घडत असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.