दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यात ९८४ वाहनांची खरेदी

२ कोटी ९३ लाखाचा आरटीओला महसूल

रत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळवारी (ता.२४) दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. हा मुहूर्त साधत जिल्ह्यात ९८४ वाहनांची विक्री झाल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यातून कराच्या स्वरूपात आरटीओ कार्यालयाला २ कोटी ९३ लाख २४ हजार ३४४ रुपये महसूल मिळाला. यामध्ये सर्वांत जास्त ७०० दुचाकींची विक्री झाली आहे. यात ३६ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश आहे.

लोकांचे राहणीमान उंचावल्याने वाहनखरेदी उद्योगाची चांगलीच चलती आहे. १०० टक्के कर्ज प्रकरण होत असल्याने आलिशान आणि विविध कंपन्यांच्या वाहनांची जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहुर्तावर जोरदार खरेदी झाली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या नोंदणीनुसार, जिल्ह्यात दसऱ्याला ९८४ वाहनांची खरेदी झाली आहे. या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर टॅक्सच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला २ कोटी ९३ लाख २४ हजार ३४४ रुपये एवढा महसूल मिळाला आहे. प्रत्यक्ष झालेली आर्थिक उलाढाल सुमारे १० ते १२ कोटीच्या दरम्यान आहेत. रत्नागिरीत विविध कंपन्यांची शोरूम आहेत. या एजन्सींच्या माध्यमातून महिन्याला ३० ते ४५ च्या दरम्यान वाहनांची विक्री होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली.

पसंती क्रमांकातून १५ लाख उत्पन्न
वाहन खरेदीनंतर पसंती क्रमांकासाठीही लाखो रुपये मोजणारी हौशी आहेत. आरटीओ कार्यालयाला या चॉइस नंबरच्या माध्यमातून १४ लाख ९९ हजार ५०० एवढे उत्पन्न मिळाले आहे.