खवटी येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड:- महामार्गावर खवटी येथील हॉटेल अनुसयाजवळ अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या इको गाडीत १ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत हस्तगत केलेला एकूण माल ५ लाख ४४ हजार २१२ रुपये किंमतीचा असून खेड पोलिसांचे जनतेतून कौतुक होत आहे.

खेड पोलिस ठाण्यात शिपाई कृष्णा बांगरना गुप्त माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी राहुल कोरे, अजय कडू, ओहोळ यांच्यासमवेत मुंबई गोवा महामार्गावर तुळशीफाटा येथे सापळा लावला होता. वाहतूकीवर लक्ष ठेवण्यास पल्सर दुचाकी (क्र. एमएच ०८ एएस १६४३) ही पुढे जात माहिती देत होती. त्यांच्यापाठी मारुती इको (क्र. एमएच ०८ एएन ७१५८) ही संशयास्पद जात असताना पोलिस पथकास दिसली. तिचा पाठलाग करीत महामार्गावरील खवटी येथील हॉटेल अनुसयानजीक ही इको पथकाने पकडली. गाडीची तपासणी केली असता एका पिशवीत ठेवलेला १ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.

इको चालक रवींद्र सहदेव जाधव (४५, रा. सिध्दार्थ नगर, भटवाडी, घाटकोपर मुंबई) याला पथकाने ताब्यात घेतले. इको गाडीची किंमत ५ लाख, १ किलो ८०० ग्रॅम वजन गांजाची किंमत २७ हजार ७२, रेडमी कंपनीचा एक मोबाईल १० हजार, अकटेल कंपनीचा एक मोबाईल १ हजार, प्लास्टिक पिशव्या ५० किंमतीच्या, असा एकूण ५ लाख ४४ हजार २१२ चा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी रवींद्र जाधव याच्याविरोधात पोलिस ठाण्यात अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९५८चे कायदा कलम ८ (क), २० (ब), २ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद कृष्णा बांगर यांनी दिली. तसेच पल्सर दुचाकीवर लक्ष ठेवणारा इसम फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेताहेत.