आरोग्यसेविकांचे आता आझाद मैदान येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन

रत्नागिरी:- कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करावे, या मागणीसाठी गेले तीन दिवस जिल्हा परिषदेसमोर या आरोग्यसेविकांचे धरणे आंदोलन सुरू होते. शुक्रवारी हे आंदोलन समाप्त झाले असून, आता दि. 30 व 31 ऑक्टोबरला आझाद मैदान येथे राज्यस्तरीय आंदोलन होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनएचएम) मध्ये गेली अनेक वर्षे कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी इत्यादी संवर्गातील कंत्राटी पद्धतीने कर्मचारी प्रामाणिकपणे व तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. वारंवार या कर्मचार्‍यांना मानधन वाढ तसेच कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले. ते पूर्ण न झाल्याने सध्या टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलन सुरू आहे.
यातील पहिल्या टप्प्यातील आंदोलन जिल्हा परिषदेसमोर पार पडले आहे. बुधवार ते शुक्रवार तीन दिवसीय हे धरणे आंदोलन झाले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचारी सहभागी झाले होते. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन घोषणा देत समाप्त करण्यात आले. या आंदोलनात सुप्रिया पाटकर, सेजल रसाळ, हर्षिता रसाळ, पुष्पा शेलार, प्रियंका भालेकर, प्रज्ञा कदम, विद्या गावडे, सायली शिवगण, योगेश वायंगणकर, तुषार साळवी आदी सहभागी झाले होते.
आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचारी 30 व 31 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरूच राहील, अशी माहिती अध्यक्ष सुप्रिया पाटकर व कार्याध्यक्ष सेजल रसाळ यांनी दिली.
जिल्ह्यातील 120 कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचारी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.