दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल

सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

रत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. दसऱ्याच्या मुहूर्ताला बाजारपेठेत कोट्यवधींचा उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून गणेशोत्सवानंतर बाजारपेठेत व्यापाऱ्यांना अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे.

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या मुहूर्तावर अनेकजण आपल्या नव्या कार्याचा शुभारंभ करतात. याचाच एक भाग म्हणून सुवर्णकार, वाहन विक्रेते तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांनी दसर्‍यासाठी जोरदार तयारी केली होती. पावसाळ्यानंतर येणार्‍या या पहिल्या मुहुर्तावर वाहन खरेदीसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झालेले असल्याने, वाहन विक्रेत्यांनी वाहने सज्ज ठेवली.

दसर्‍या निमित्ताने रत्नागिरी बाजारपेठेसह जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, लांजा, राजापूर व देवरुखसह शृंगारतळी या प्रमुख बाजारपेठा सजल्या होत्या. विशेषत: सुवर्णकारांनी आपल्या पेढ्यांना विजेची आकर्षक रोशणाई केली होती. येत्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याने, नागरिक दसर्‍याचा मुहूर्त साधत सोने खरेदी केली. रात्री उशिरा पर्यंत सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होती.

सोन्या-चांदीप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकानेही विविध योजनांद्वारे ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षक अशा स्कीम ठेवल्या होत्या. मागील काही वर्षात नामांकित कंपन्यांनी रत्नागिरीत शोरुम सुरु करीत, ग्राहकांसमोर अनेक पर्याय ठेवले. सोन्याचा आणि वाहन दुकानानंतर इलेक्ट्रॉनिक दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

पावसाळ्यानंतर खर्‍या अर्थाने येणारा मोठा सण म्हणजे विजयादशमी. या निमित्त यावेळी वाहन उद्योगांची उलाढाल मोठी असते. विशेषत: नवरात्री व त्याआधीच वाहनांची बुकिंग करुन दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर वाहने घरी आणण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे दसर्‍याच्या वाहन खरेदीसाठी दुचाकी, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी देखील शोरुम सज्ज ठेवली होती.

मागील काही वर्षात नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व वाढल्याने सायकल खरेदीकडेही कल वाढला. रत्नागिरीतील अनेक सायकल मार्टमध्ये नवनवीन कंपन्यांच्या सायकलींची विविध मॉडेल्स विक्रीकरिता दाखल झाली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकजणांनी नवनव्या सायकली आपल्या घरी नेल्या.