राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघात रत्नागिरीच्या पायल पवारची निवड

रत्नागिरी:- गोवा येथे होणार्‍या 37 व्या नॅशनल गेम्स खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांची घोषणा करण्यात आली असून, महिलांच्या 15 सदस्यीय संघामध्ये रत्नागिरीच्या पायल पवार हिची निवड झाली आहे.

नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिला या दोन्ही खो-खो संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली. दोन्ही संघांमध्ये अनुभवी खेळाडूंसह तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दोन्ही संघ सुवर्णमय कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. या संघामध्ये रत्नागिरीच्या पायल पवारची निवड झाली आहे. पायल पवारने मागील काही वर्षात खो-खोमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने यश मिळवले आहे. गतवर्षी तिची खेलो इंडियासाठीही निवड झाली होती.
पायल पवार हिच्या निवडीबद्दल आर. ए. सोसायटीचे कार्यवाह सतिश शेवडे व क्रीडा प्रशिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.