जिल्ह्यात वर्षभरात ऑनलाईन फसवणुकीचे ६० गुन्हे

५४ लाखांची फसवणूक; ३ लाख ५४ हजार रुपये परत

रत्नागिरी:- जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. झटपट पैसे मिळविण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या, आमिषे दाखवत अनेकांना ऑनलाईन गंडा घातल्याचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. सुशिक्षित लोकं जास्त फसल्याचे धक्कादायक चित्र पुढे येत आहे. वर्षभरात ६० सायबर गुन्हे घडले असून यामध्ये ५४ लाख २४ हजार ८७३ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर सायबरचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे.

पोलिस दल, बॅंका आवाहन करत आहेत, तरी अनेक लोक आमिषाला बळी पडून फसवणूक करून घेत आहेत. वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता आता स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे स्थापन करण्यात आले आहे. अशी फसवणूक होणार नाही, यासाठी नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे. परंतु फसवणूक झालीच तर मात्र तुमच्या मागे सायबर पोलिस ठाणे आहे. फसवणुकीतील ३ लाख ५४ हजार ९८० रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. ३ लाख ८४ हजार ३५४ एवढी रक्कम बॅंकेत गोठविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये असे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांमध्ये पोलिस ठाण्यांमधून तांत्रिक मदतीची मागणी केल्याप्रमाणे सायबर पोलिस ठाण्याकडून आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत केली जाते. सोशल मीडियासंदर्भातील दाखल गुन्ह्यांबाबत संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे पत्रव्यवहार करून पुराव्याकामी माहिती प्राप्त केली जाते. त्याशिवाय ५ लाख रुपये व त्याहून जास्त रकमेची फसवणूक असलेले, तसेच क्लिष्ट स्वरूपाचे सायबर गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल होतात. आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून गेलेली रक्कम ज्या खात्यात गेली आहे, ते खाते गोठवता येऊ शकते.

रत्नागिरी सायबर ठाण्यात १ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलिस हवालदार, ५ पोलिस शिपाई कार्यरत आहेत. ही यंत्रणा सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कार्यरत आहे. सायबर गुन्ह्यांबाबत दक्ष राहून गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील असतात. त्यांना त्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आणि आधुनिक यंत्रणा दिली आहे.

सायबर गुन्हेगार हे प्रत्येक सायबर गुन्ह्यामध्ये काही ना काही पुरावा मागे सोडतात. सायबर गुन्हेगारांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक, सोशल मीडिया अकाउंट, बँक खाते इत्यादीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांचा मागोवा घेऊन. तपासाला दिशा देऊन संशयिताला अटक केली जाते.

सायबर गुन्हेगार हे देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही बसून आर्थिक फसवणूक करू शकतात. परंतु, एकंदरीत पाहिले असता सायबर गुन्हेगार हे झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल व दिल्ली या राज्यांमधून जास्तीत जास्त सक्रिय असल्याचे निदर्शनात आले आहे.

गुन्हेगारांनी वापरलेल्या बॅंक खात्यांची त्वरित माहिती मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बॅंक अधिकाऱ्यांचा स्वतंत्र व्हॉट्स ॲप ग्रुप बनविण्यात आला आहे. गुन्हा घडताच याठिकाणी माहिती दिली जाते. त्यामुळे संबंधित बॅंकेला पुढील कार्यवाही करणे सोपे जाते.

लोकांच्या असाहाय्यतेचा फायदा उठवून, त्यांना बक्षिसाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या या भामट्यांचा शोध लागणे तसे मुश्कीलच. सायबर गुन्हेगार हे परराज्यातील असल्याचे उघड झाले आहे. या व्यक्ती एकाच ठिकाणी राहत नाहीत. ते वारंवार मोबाइल नंबर, पत्ता बदलत असतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान असते. तरीही हे आव्हान पेलून पोलिस यंत्रणा त्यांना अद्दल घडविण्यासाठी सज्ज आहे.

सोशल मिडिया वापरताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी कोणतीही राजकीय सामाजिक तसेच धार्मिक आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नका. सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा यासबर पोलिस ठाण्याशी मो. क्र. ८८३०४०४६५० यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.