बसस्थानकाच्या जुन्या ठेकेदाराची निविदा रद्द; नवी निविदा तीन महिन्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी बसस्थानकाच्या कामाचे जुन्या ठेकेदाराचे निविदा रद्द करण्यात आली असून 14 ते 15 कोटींचे नवीन कामाची निविदा प्रक्रिया या 3 महिन्यात पूर्ण होणार आहे. यासाठी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे एमआयडीसीमधून निधी देखील देणार आहे.

गेले 10 वर्षांपासून रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे स्वप्न रत्नागिरीकर पाहत आहेत. मात्र, सरकार बदलले, कमी बजेट, कोरोना अशा विविध अडचणीत नवीन बसस्थानक बांधकाम काम रखडलेले होते, ज्या ठेकेदारांनी काम घेतले होते, त्यांनी देखील कामत दिरंगाई केली तसेच बजेट वाढवून मागितले त्यामुळे हा ठेका रद्द करण्यात आला. आता याची फेरनिविदा काढण्यात येणार असून या प्रक्रियेस 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे, त्यानंतर एकंदरित या कामाला 5 ते 6 महिने लागणार असल्याचीमाहिती एसटी महामंडळ कडून सांगण्यात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधून निधी देण्यास मंजुरी दिली असून या हायटेक बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम पूर्णपणे बंद आहे. राहाटघर येथून सर्व लांब पल्ल्याच्या बसेसची सेवा सुरू असली तरी या ठिकाणी असलेल्या असुविधांबाबत प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.