नासासह इस्रोला जाण्यासाठी २० हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

रत्नागिरी:- अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना गतवर्षी नेण्यात आले होते. यावर्षीसुद्धा हा उपक्रम असणार असून, यासाठी सोमवारी 20 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यातून 50 जणांची निवड होणार असून, 20 जण नासासाठी तर 30 जण इस्रोसाठी भेटीला जाणार आहेत.

जिल्हा परिषदेमार्फत यावर्षी देखील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे समर घडविण्यात येणार आहे. यावेळेस एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळास्तरावर 251 केंद्रांवर 20 हजार 511 विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली आहे. त्यातून एकूण 50 विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार असून, त्यातील 20 मुले नासासाठी निवडली जाणार आहेत.

खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो या संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडवण्यावर गतवर्षीपासून भर देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नासा व इस्त्रो या विज्ञान संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांना भेटी घडविण्याचे नियोजन सुरू झालेले आहे. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या पूर्वीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. नासा व इस्त्रो भेटीसाठी जि. प. प्रशासनस्तरावर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 20 हजार 511 विद्यार्थी बसले होते. त्यामधून बीटस्तरासाठी, तालुकास्तर आणि त्यानंतर जिल्हास्तराच्या परीक्षेसाठी विद्यार्थी निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावर परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा विज्ञानातील तज्ज्ञ मंडळींकडून मुलाखतीद्वारे अंतिम 50 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. गतवर्षी 27 मुलांची निवड करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये 23 मुलांची भर पडणार आहे.