जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक महिला जिल्हा परिषदेवर धडकल्या

रत्नागिरी:- दरमहा किमान वेतन, ऑनलाइन कामाची सक्ती नको, दिवाळी व भाऊबीज भेटीसह विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो आशा, गटप्रवर्तक भर उन्हात जिल्हा परिषदेवर धडकल्या. या वेळी उद्यापासून (ता. 18) बेमुदत संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. सरकारविरोधात घोषणा देत जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.

आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन, गटप्रवर्तक महिलांना दरमहा 8 हजार 450 रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता, ऑनलाइन कामाची सक्ती करणे बंद करा, दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्या अशा घोषणा उपस्थित महिलांनी दिल्या. जिल्हापरिषदेसमोर जोरदार निदर्शने करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्यांना शिष्टमंडळाने 18 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले. या कालावधीत कोणत्याही आशा व गटप्रवर्तक महिलेला त्रास देऊ नये, अन्यथा महिला ते सहन करणार नाहीत. अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये शंकर पुजारी यांनी संघटनेतर्फे केलेल्या मागण्यांचे निवेदन राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पाठवून देऊ, असे सांगितले. तसेच डॉ. अनिरूध्द आठल्ये म्हणाले, यापूर्वी माझे कुटुंब माझी रत्नागिरी यातील केलेल्या कामाचा मोबदला लवकरच आशा गटप्रवर्तकांना देण्यात येईल. आठ महिला कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या केस काढून घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येणारा आहे. निवडणुकीचे काम ज्या आशांनी केलेले आहे, त्यांचाही फरक लवकरच दिला जाईल.

ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवत असतानाच भर उन्हात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला या आंदोलनाला आल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व विजया शिंदे, विद्या भालकर, पल्लवी पारकर, संचिता देसाई, धनश्री जाबरे, अनुष्का मोरे, सोनाली बाइत, आयेशा बागवान यांनी केले होते.