यावर्षी सांभाळूनच! ऑक्टोबर हीट ठरणार तापदायक

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टी भागात जेमेतेम सरासरी इतका पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळा तापदायक ठरण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. बुधवारी सकाळी रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात 30 ते 32 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. परतीच्या पावसाने लवकरच आटोपते घेतल्याने आता सध्या ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव किनारपट्टी भगात जाणवू लागला आहे.

पावसाने माघार घेतल्यानंतर सध्या पूर्व आणि ईशान्येकडून वारे येत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली आहे. गरम हवा, तापमानाचा ताप, आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड, अतिरिक्त दमवणूक अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात रत्निागिरीकर अनुभवत आहे. सोमवार, मंगळवार तसेच बुधवारीही तापमानाने तिशी ओलांडली होती. पुढील काही दिवसात हे तापमान आणखी एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. तरीही आर्द्रतेचे प्रमाण अजूनही 70 ते 80 टक्क्यांच्या पुढे असल्याने उकाड्याने नागरिकांत उन्हाळ्याची चाहुल जाणवू लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत गेल्या तीन आठवड्यापासून सरासरीपेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे आगामी काळात कोकणातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा, अशा सूचना आरोग्य विभघाने केल्या आहेत. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असून दरवर्षी ही तीव्रता वाढत जाणार आहे. यंदा सलग दुसर्‍यांदा कोकण किनारपट्टीलगत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे