जिल्ह्यातील हजारो शेतकरी विमा रकमेच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- शेतकर्‍यांनी 2022/23 ला आंबा काजूचा शेती विमा भरला होता. या हंगामात हवामानात फार मोठा बदल झाला. पाऊस आणि अतिउष्णता यामुळे आंबा काजूचे फार मोठे नुकसान झाले. आंबा काजुचा मोहर करपला तर अती उष्णतेमुळे आंबा, काजूही भाजला. त्यामुळे फार मोठे नुकसान झाले. मात्र विमा कंपन्यांकडे विम्याचे हप्ते भरूनही अद्यापपर्यंत विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी आंबा, काजूचे फार मोठे नुकसान होते. शेतकर्‍यांना आंबा काजूसाठी लागणारे खत, फवारण्या, देखभालीसाठी मोठा खर्च येतो. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज उचलत असतात. मात्र, यावर्षी अति उष्णता आणि पाऊस यामुळे आंबा काजू बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले. बँकांकडून कर्ज घेतली असल्यामुळे त्याचा अधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

आंबा काजू बागायतदार शासनाच्या नियमाप्रमाणे शेती विमा पॉलिसी काढतात. विमा कंपन्यांना ठरलेल्या मुदतीप्रमाणे विमा कालावधी संपल्यानंतर 45 दिवसानंतर विम्याची नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र मे महिन्यामध्ये त्याची मुदत संपली असून गेले चार महिने विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांकडे शेतकर्‍यांनी संपर्क साधला असता चालढकल केली जात आहे. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा कराव, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.