कुवारबाव बाजारपेठेत चौपदरीकरण वेगाने

मिऱ्या-नागपूर महामार्ग ; दुकाने, गाळे पाडून सपाटीकरण

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये असलेल्या कुवारबाव बाजारपेठेतील काम अखेर सुरू झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा मीटर जागा संपादित करण्यात आली. यामध्ये आलेली बाजरपेठेतील दुकाने, गाळे आदी हटविण्यास सुरवात झाली आहे. येथे उड्डाणपूल होणार असल्याचे समजते. बाजारपेठ वाचणार असल्याने या कामाला बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काम अधिक वेगाने सुरू आहे.

मिऱ्या नागरपूर रस्त्यामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख तालुक्यातील जागा संपादित करण्यात आली आहे. आंबा घाटापर्यंतच्या भूसंपादनाची जबाबदारी येथील प्रातं कार्यालयाकडे होती. यामध्ये २१ गावांचा समावेश आहे. भूसंपादन होऊन त्यांना शासनाकडून मोबदला वाटप करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र कुवारबाब बाजारपेठ या रस्त्यामध्ये उद्ध्वस्त होत असल्याने या रस्त्याला तेथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. अनेक वेळा भूसंपादनाचे काम थांबविले होते. पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्यात आले होते. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने देखील केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली होती. परंतु या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रकल्प असल्याने यामध्ये कोणताही बदल झाला नाही. अखेर उड्डाणपुलाचा निर्णय झाला आहे. दोन्ही बाजूंनी समान जागा जावी, यासाठी हा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार ही पंधरा मीटरची जागा संपादित करण्यात आली असून आता चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनीही या कामाला सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारल्याने या भागातून वेगाने काम सुरू झाले आहे.