जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातजणांकडून एकाला बेदम मारहाण

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजस्तंभासमोरच एकाला तब्बल सात जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री १२:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. किरकोळ कारणातूनही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी पोलिसांनी मार खाल्लेल्याचे नाव उघड केलेले नाही.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, २६ सप्टेंबर रोजी ते टीआरपी येथील त्यांच्या बहिणीकडे आपल्या मुलीच्या औषधोपचारासाठी कुटूंबासह आले होते. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी बहिणीचे पती मुंबईहून येणार असल्यामुळे फिर्यादी त्यांना रेल्वेस्टेशन येथे घेण्यासाठी जात असताना बहिणीने त्यांना आईस्क्रिम आणण्यास सांगितले होते. बहिणीच्या पतीला रेल्वेस्टेशन येथून घेऊन फिर्यादी जयस्तंभ येथून आईस्क्रिमचे दुकान पाहत जात होते. ते जयस्तंभ येथे आले असता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्या ओळखीचा तेजस शेट्ये (रा. साखरपा, ता. संगमेश्वर) दिसला. फिर्यादीने त्याला गाडी थांबवून हाक मारत ‘तू कुठे जातोस’ असे विचारले. परंतु तो गडबडीत दिसला.

त्याचवेळी तिथेच काही लोक उभे होते. त्यातील एकाने फिर्यादीला ‘काय रे तुझे काय काम आहे’ असे विचारले. त्यावर फिर्यादीने ‘तुझा काय संबंध’ असे बोलल्यावर विराज कुमठेकरने फिर्यादीची कॉलर धरून मान आवळत नाकावर, कपाळावर, चेहेऱ्यावर ठोसे मारले. त्यानंतर तिथेच उभे असलेले विराजचे मित्र सुद्धा तिथे आले आणि त्यांनी सुद्धा फिर्यादीला शिवीगाळ करत जबर मारहाण केली.

या प्रकरणी विराज शेखर कुमठेकर (२५, रा. कोकण नगर, रत्नागिरी ) आणि त्याच्या ६ अज्ञात मित्रांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.