रत्नागिरीच्या मत्स्यालयात समुद्री माशांच्या ९० प्रजाती

अबब…देवमाशाचा ५५ फुटी सांगाडा, आयुष्याची ५०हून अधिक वर्षांचे कासव, काचेसारखा पारदर्शक ग्लास फिश अर्थात् काचूक मासा, गोड्या आणि सागरी पाण्यातील माशांच्या जवळपास ९० प्रजाती मत्स्यालयात तर २५४ समुद्री जलचरांच्या प्रजाती रसायनामध्ये मत्स्य संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या रत्नागिरी झाडगावमधील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या मत्स्यालयाने पर्यटकांना भुरळ घातली आहे. यावर्षी येथे ३६ हजार पर्यटकांनी भेट दिली असून यातून १२ लाख ४२ हजार उत्पन्न मिळाले आहे.
मत्स्यालयात गोड्या पाण्यातील माशांचे अॅक्वेरियम, सिक्लिड माशांचे अॅक्वेरियम, टेडप्लांटेड (पाणवनस्पतींचे) अॅक्वेरियम तसेच मरिन अॅक्वेरियम बनवण्यासाठी आधुनिक फिल्टरेशन व प्रकाशयोजनेचा उपयोग करण्यात आला आहे. मत्स्यालयामध्ये प्रदर्शनामध्ये माशांच्या प्रजातींमध्ये अरोवाना मासा, हम्पी हेडफ्लॉवर हॉर्न फिश, डिस्कस मासे, ब्लॅक घोस्ट फिश, पाकू मासा असे विविध आकर्षक गोड्या पाण्यातील मासे आहेत तर लायन फिश, बटरफ्लाय माशांच्या विविध प्रजाती, डॅमसेल माशांच्या विविध प्रजाती, पफर माशांच्या विविध प्रजाती पर्यटकांना अधिक आकर्षित करत आहेत. प्लांटेड अॅक्वेरियमच्या विविध १५ प्रकारच्या पाण वनस्पतींनी सजवलेले हे अॅक्वेरियम पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेते. मत्स्य संग्रहालयामध्ये विविध २५४ प्रजाती समुद्री जलचर रसायनामध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत तसेच शंख-शिंपल्यांच्या विविध प्रजाती प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत. मत्स्य संग्रहालयातील डॉल्फिन मासा, ५० वर्षाहून अधिक काळ जतन केलेले जिवंत कासव पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेते.
मत्स्यालयाला भेट देण्यासाठी शालेय सहली मोठ्या प्रमाणात येतात.१० वीपर्यंत १० रुपये प्रती विद्यार्थी (शाळेचे विनंती पत्र आवश्यक) तर ३ वर्षावरील सर्व पर्यटकांना प्रती व्यक्ती २० रु. शुल्क आकारले जाते. पर्यटकांना केंद्राच्या तलावामध्ये बोटिंगची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. मत्स्यालय सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत. (हंगामामध्ये संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत) सुरू असते. यावर्षी ३६ हजार २३० पर्यटकांनी मत्स्यालयाला भेट दिली असून, यातून १२ लाख २० हजार उत्पन्न मिळाले. यामध्ये २ हजार विद्यार्थी असून, त्यांच्याकडून २२ हजार २३० उत्पन्न मिळाले आहे.